चांदीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
सोन्या- चांदीचे दर दिवसानुदिवस गगनाला भिडत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील सोनं- चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यातच आता बोटावर मोजण्या एवढ्याच तासांत चांदीची विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात ३ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
सराफ व्यावसायिकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धविरामा संदर्भात चर्चा होणार आहे. या जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. जर आज या दोन्ही देशांत युद्धविरामाबाबत सकारात्मक चर्चा झाली, तर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे.
जळगाव सराफ बाजारात आज सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५५ हजार २२१ रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत. तर, चांदीच्या दरानेही सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जीएसटीसह चांदी २ लाख ५८ हजार ३५० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये मोठी चिंतेची स्थिती आहे.

