कोणाला किती जागा मिळणार?
मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
आगामी विधानपरिषद निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे म्हणजेच ‘महायुती’ म्हणूनच लढणार असून, यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याकडून याला दुजोरा मिळाला आहे. तब्बल १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत जागावाटपाचा एक प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा सुरू असल्याची चर्चा होती. भाजपचे अनेक ठिकाणी बहुमत असल्याने १६ पैकी १४ ते १५ जागांवर भाजप उमेदवार देणार असल्याचे म्हटले जात होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. अशातच आता आता महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकांच्या जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भारतीय जनता पक्ष १२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, शिवसेना शिंदे गटाला ३ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला २ जागा मिळणार आहेत.

