ड्रग्ज रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ अश्विनी पॉल!
मुंबई: मुंबईतल्या हाय-प्रोफाईल नेस्को कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा जीव गेला आणि समोर आलं एक भयानक ड्रग्ज रॅकेट! पण या रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ एक महिला असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अश्विनी पॉल! 10 वी नापास, एकेकाळची बार डान्सर, पण आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी ड्रग्ज सप्लायर.
टिटवाळ्याच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये छापा टाकला आणि पोलिसांचे डोळे पांढरे झाले. तिथून जप्त झाल्या तब्बल ६ कोटींच्या 5,000 ‘एक्सटसी’ गोळ्या! पोलिसांना चकवा देण्यासाठी ती दर 2 महिन्यांनी घर बदलायची. पण साकीनाक्यातून मिळालेल्या एका सुगाव्याने या ‘ड्रग्ज क्वीन’चा खेळ संपवला.
अश्विनी हिने आजवर अनेक पार्ट्यांना ड्रग्ज पुरवलं होतं.. तरी देखील ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. कारण पोलिसांना चकवा देण्यासाठी तिनं शक्कलच तशी शोधली होती. मात्र नेस्को ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना तिच्याबाबत एक मोठी टिप मिळाली. पोलिसांना ही संधी दवडायची नव्हती. त्यांनी देखील पाळत ठेवली आणि योग्यवेळी छापा मारून तिला बेड्या ठोकल्या. तिच्या घरातून थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 6 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं.
कोण आहे ही ड्रग्ज क्विन आणि तिचा वादग्रस्त भूतकाळ काय आहे?
रंगीबेरंगी एक्स्टसी गोळ्यांच्या माध्यमातून तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. टिटवाळा परिसरात राहणारी अश्विनी पॉल ही या रॅकेटमागची प्रमुख ‘ड्रग्ज क्वीन’ असल्याचा संशय असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिच्या घरावर छापा टाकत तब्बल 6 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
नेस्को प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने साकीनाका परिसरातून इरफान अन्सारी याला अटक केली होती. त्याच्याकडून 200 एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुफियान नावाचा आणखी एक आरोपी पकडण्यात आला. या दोघांच्या चौकशीतूनच अश्विनी पॉलचे नाव समोर आले. सुफियान हा अश्विनी आणि इरफान यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
अश्विनी पॉल ही मूळची पुण्याची रहिवासी असून तिने सुरुवातीला मुंबईत बारबाला म्हणून काम केले होते. डान्स बारमध्येच तिची ओळख ड्रग्ज तस्करांशी झाली आणि हळूहळू ती या रॅकेटमध्ये सक्रिय झाली. तपास चुकवण्यासाठी ती दर दोन ते तीन महिन्यांनी आपले ठिकाण बदलत होती. टिटवाळ्यापूर्वी तिचे वास्तव्य नवी मुंबई आणि कल्याण परिसरात होते. शेवटी ही ड्रग्ज रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ अश्विनी पॉल पोलिसांच्या जाळ्यात सापडली.

