ऐकावं ते नवलंच! अधिकमासची भेट म्हणून जावयाला दिली किडनी भेट…

सासऱ्याने जावयाला दिली अनमोल भेट..

महाराष्ट्र: अधिक महिना म्हणजे धोंड्याच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाला विशेष मन देऊन भेट वस्तू दिल्या जातात. त्यातच आता एक अशी गोष्ट समोर आली आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लातूरच्या औसा तालुक्यातील एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयाला अनमोल भेट दिली आहे.

या अनमोल भेटीचं मूल्य ना सोन्या चांदीत होऊ शकतं ना पैशात. ज्याची किंमत जगातल्या कोणत्याही हिऱ्या-मोत्यापेक्षा लाख पटीने मोठी आहे. दोन्ही किडन्या निकामी होऊन मृत्यूशी झुंजणाऱ्या जावयासाठी हा सासरा थेट देवदूत बनून धावला. त्याने स्वतःची किडनी दान करत जावयाला नवं आयुष्य दिलं. त्यांच्या या अनमोल भेटीची गावभरच नाही तर राज्यभर चर्चा झाली आहे. आलमला औसा इथे दयानंद कोरके आणि त्यांचे सासरे भाऊसाहेब गणपती मुदगुणे यांच्या या अनोख्या अधिकमासाच्या गिफ्टची चर्चा होत आहे.

दयानंद कोरके हे औसा इथे शिवलिंगेश्वर फार्मसी महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करतात. त्यांना गुटखा, दारू, सिगारेट असं कसलंही आणि कोणतेही व्यसन कधीच केलं नाही. अचानक झालेल्या काही त्रासानंतर जेव्हा वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्याचे समोर आलं. अशा अत्यंत कठीण आणि जीवन-मरणाच्या प्रसंगात, कोणतीही भीती आणि स्वार्थाचा विचार मनात न आणता त्यांचे सासरे भाऊसाहेब मुदगुणे हे कुटुंबासाठी साक्षात देवदूत बनून पुढे आले.

आपल्या पोटच्या लाडक्या लेकीच्या डोळ्यांतील पाणी आणि जावयाची मृत्यूशी चाललेली ही जीवघेणी झुंज शेतकरी बापाला अजिबात पाहावली नाही. भाऊसाहेब मुदगुणे यांनी कसलीही हिचकिचाहट न बाळगता किंवा कसलाही संकोच न करता स्वतःची एक किडनी आपल्या जावयाला देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *