संजय निरुपमांची मोठी मागणी..

मुंबई: जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि रिक्षा किंवा टॅक्सी चालवत असाल तर १ मे पासून तुमचे परमिट धोक्यात येऊ शकतं? रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आता फक्त गाडी चालवून चालणार नाही, तर तुम्हाला महाराष्ट्राची भाषाही आलीच पाहिजे! महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमांनुसार, १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे आणि त्यासाठी आता तुमची रीतसर परीक्षा घेतली जाईल.
या निर्णयाबाबत कुठे सकारात्मक पडसाद उमटताय तर कुठे नकारात्मक. त्यातच आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदेंना घरचा आहेर दिला आहे. शिंदे गट नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला ‘अन्यायकारक’ म्हणत घरचा अहेर दिला आहे. मराठी भाषा आलीच पाहिजे, मात्र हंटर चालवून किंवा दबाव टाकून भाषा शिकवली जाऊ शकत नाही, अशी भूमिका निरुपम यांनी मांडली आहे.
राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार, १ मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी ज्ञानाची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये जे चालक नापास होतील, त्यांचे परमिट रद्द केले जाईल आणि लायसन्स जप्त करण्याची तरतूद आहे. सरकारच्या या ‘कठोर’ भूमिकेमुळे रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी त्याला विरोध केला असून आज पत्रकार परिषद घेतली. मंत्रालयात परिवहन विभागासोबत बैठक पार पडणार आहे. त्याआधी निरुपम यांनी मराठी सक्तीबाबत भूमिका मांडली.
काय म्हणाले संजय निरुपम?
अनेक चालक मराठी बोलू शकतात, पण परीक्षेत फेल झाले तर त्यांच्या उदरनिर्वाहाचे काय? अनेकांनी रिक्षासाठी कर्ज घेतले आहे, त्यांचे परमिट रद्द झाले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. केवळ रिक्षाचालकांवरच ही मराठीची सक्ती का? असा सवाल त्यांनी केला. कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांमध्ये काम करणाऱ्यांवरही हा नियम लागू करा, अशी मागणी त्यांनी केली.

