अकाउंट बंद करून होईल नुकसान..
नवी दिल्ली: तुम्ही PPF अकाउंट बंद करण्याचा विचार करत आहात का? करण्याआधी विचार करा कारण याचा तुम्हाला फायदा नाही तर नुकसान होणार आहे. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ही भारतीयांची पहिली पसंद आहे. पीपीएफ एक लॉन्ग-टर्म सेव्हिंग स्किम आहे. ही स्किम भारत सरकारद्वारे चालवली जाते. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान 500 रुपयांपासून मॅक्सिमम 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
पीपीएफची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची सरकारी गॅरंटी आहे म्हणजेच तुमचा पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यावर मिळणारं रिटर्नही पूर्णपणे टॅक्स-फ्री असतं. तुम्ही अकाउंट वेळेपूर्वी बंद केलं तर तुम्ही दीर्घकाळाच्या टॅक्स-फ्री कंपाउंडिंग लाभाला कायमचं हरवता. या स्किमचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो. म्हणजेच या कालावधीनंतर तुम्ही पूर्ण पैसा काढू शकता. मात्र अनेकदा आर्थिक संकट किंवा कोणत्याही गुंतवणुकीच्या मोहात गुंतवणूकदार आपलं पीपीएफ अकाउंट वेळेपूर्वीच बंद करतात. तुम्हीही असाच काही विचार करत असाल तर थोडं थांबा. नियम जाणून न घेता अकाउंट बंद केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं.
पीपीएफचा एकूण कालावधी 15 वर्षांचा असतो. खरतर सरकार विशेष परिस्थिती जसं की, गंभीर आजार किंवा उच्च शिक्षणाच्या गरजांसाठी 5 वर्षांनंतर अकाउंट बंद करण्याची परवानगी देते. पण असं केल्यावर तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागते. नियमांनुसार, तुम्ही वेळेपूर्वी अकाउंट बंद केलं तर अकाउंट ओपन करण्याच्या तारखेपासून तर बंद करण्याच्या तारखेपर्यंत मिळणाऱ्या व्याजात 1% ची कपात केली जाऊ शकते.
तुम्हाला 7.1% च्या दराने व्याज मिळत असेल तर वेळेपूर्वी पैसे काढल्यास व्याजदर फक्त 6.1% च्या आधारे दिलं जाईल. ही 1% कपात ऐकायला खुप कमी वाटते. पण 10-12 वर्षात जमा होणाऱ्या फंडावर लाखो रुपयांचं नुकसान तुम्हाला होऊ शकतं. या सोबतच तुम्ही भविष्यात मिळणाऱ्या चक्रवृद्धी व्याजापासून मुकाल. यामुळेच पीपीएफ अकाउंट 15 वर्षांपूर्वी फक्त अत्यंत आवश्यक असल्यावरच बंद करा.

